PBG Pune Jaguars Diya Chitale UTT : पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पीबीजी पुणे जाग्वार्सने यंदाच्या सातव्या हंगामासाठी झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावात पुन्हा एकदा आपल्या भारतीय खेळाडूवर विश्वास दाखवत भर दिला आहे. या लिलावात दिया चितळे हिने सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळवणारी भारतीय खेळाडू ठरत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तिला यावेळी ३७.४ लाख टोकन्स इतकी मोठी रक्कम देण्यात आली. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अनुभवाचा संगम – पीबीजी पुणे जाग्वार्सने केवळ भारतीय खेळाडूंवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या खेळाडूंनाही आपल्या संघात सामावून घेतले आहे. फ्रान्सची प्रितिका पावाडे आणि इजिप्तचा ओमर असार यांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, देशांतर्गत फळी अधिक भक्कम करण्यासाठी स्नेहित एसएफआर, मुदित दानी आणि सायनिका माजी यांचीही निवड करण्यात आली आहे. पीबीजी पुणे जाग्वार्स या निवड लिलावाबाबत बोलताना स्पर्धेच्या सहप्रवर्तक विटा दानी यांनी सांगितले की, “या वर्षीची खेळाडू लिलाव प्रक्रिया स्पर्धेची गुणवत्ता दर्शवते. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच उदयोन्मुख भारतीय खेळाडूंमध्ये संघांनी केलेली गुंतवणूक ही सकारात्मक बाब आहे.” दिया ही आधीच जगातील उत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणली जाते – पुनीत बालन पीबीजी पुणे जाग्वार्स यूटीटी पीबीजी पुणे जाग्वार्सची रणनीती स्पष्ट होती मजबूत भारतीय खेळाडूंवर आधार ठेवत त्याभोवती आंतरराष्ट्रीय अनुभवाची जोड देणे. याबाबत संघाचे मालक पुनीत बालन म्हणाले, “दिया ही आधीच जगातील उत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणली जाते. ती आमच्या योजनांचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भोवती आम्ही संतुलित आणि सक्षम संघ उभारण्यावर भर दिला आहे.” हेही वाचा – MI vs SRH : रायन रिकल्टनची शतकी खेळी व्यर्थ! हेड-क्लासेनच्या वादळासमोर मुंबईचे गोलंदाज हतबल; हैदराबादचा विजयी पंच एकूण सात संघ होणार सहभागी – स्थिर आणि अनुभवी खेळाडूंचा गाभा तसेच सर्व विभागांमध्ये सखोलता असलेला पीबीजी पुणे जाग्वार्स संघ यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीसाठी सज्ज आहे. यंदाच्या सातव्या हंगामात एकूण सात संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघाशी एकदा सामना करेल. साखळी फेरीतील अव्वल चार संघ पुढील बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.