Paytmच्या डिजिटल वॉलेटला RBIची मंजुरी; शेअरने गाठला आतापर्यंतचा उच्चांक
Paytm : पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेसला RBIची प्रीपेड वॉलेटसाठी सैद्धांतिक मंजुरी मिळाली. यानंतर पेटीएमचा शेअर १,९५८.८० रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या तिमाही नफ्यातही दहापट वाढ झाली.

Paytm : पेटीएमच्या डिजिटल वॉलेट व्यवसायासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेडला (PPSL) भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी सैद्धांतिक मंजुरी दिली. यामुळे कंपनीला प्रीपेड वॉलेटसह प्रीपेड पेमेंट सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीनंतर पेटीएमच्या शेअरमध्येही मोठी तेजी दिसून आली.
प्रीपेड पेमेंट म्हणजे काय?
प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) म्हणजे आधी पैसे जमा करून नंतर त्याद्वारे व्यवहार करण्याची सुविधा. डिजिटल वॉलेट हे त्याचे एक उदाहरण आहे. ग्राहक या माध्यमातून मोबाईल रिचार्ज, वीजबिल आणि इतर डिजिटल व्यवहार करू शकतात. मात्र, कोणत्या सुविधा देता येतील, हे RBIचे नियम आणि कंपनीला मिळालेल्या परवानगीवर अवलंबून असेल.
पेटीएमचा शेअर आतापर्यंतच्या उच्चांकावर
RBIच्या मंजुरीच्या बातमीनंतर पेटीएमच्या शेअरमध्ये तेजी आली. शुक्रवारी कंपनीचा शेअर १,९५८.८० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. २०२१ मध्ये पेटीएमचा आयपीओ आला होता. त्यावेळी शेअरची इश्यू किंमत २,१५० रुपये होती. मात्र, शेअर बाजारात प्रवेश केल्यानंतर त्यात घसरण झाली होती. आता प्रथमच शेअरने १,९५० रुपयांची पातळी ओलांडली आहे.
तिमाही नफ्यात दहापट वाढ
पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत २२५ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा २१ कोटी रुपये होता. म्हणजेच नफ्यात दहापटपेक्षा अधिक वाढ झाली. कंपनीने सलग सहाव्या तिमाहीत नफा मिळवला आहे.
या तिमाहीत कंपनीचा महसूल २८ टक्क्यांनी वाढून २,६४८ कोटी रुपये झाला. तर एबिटा ९० टक्क्यांनी वाढून विक्रमी २७० कोटी रुपयांवर पोहोचला. एबिटा मार्जिनही प्रथमच १० टक्क्यांवर गेले.
आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा नफा ४४५ कोटी रुपये झाला. मागील वर्षी याच काळात तो १४४ कोटी रुपये होता. पेमेंट सेवांमधील महसूल २५ टक्क्यांनी वाढून १,४३४ कोटी रुपये, तर वित्तीय सेवा वितरणातून मिळणारा महसूल ४९ टक्क्यांनी वाढून ९१२ कोटी रुपये झाला.





