युवा प्रशिक्षणार्थींचे मानधन तातडीने द्या, अन्यथा मोर्चा – संभाजी माळवदे

नेवासा : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेतंर्गत नियुक्त तरुणांचे मानधन तात्काळ देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी केली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना त्यांनी आठ दिवसांत मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थींसह मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
मागील शिंदे सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या योजनेतंर्गत तरुणांना ११ महिन्यांसाठी १० ते २० हजार रुपये मानधन देऊन विविध विभागांत नियुक्त केले. मात्र, चार-पाच महिने उलटूनही मानधन मिळाले नाही. कौशल्य विभाग आणि संबंधित अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नसल्याने तरुण हैराण झाले आहेत.
कायमस्वरूपी नोकरीचा अभाव आणि मानधनातील विलंबामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कौशल्य विभागाची बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी काँग्रेसचे अंजुम पटेल, कैलास बोर्डे, सतीश तऱ्हाळ, संदीप मोटे आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
युवा प्रशिक्षणार्थी योजनेने तरुणांची दिशाभूल केली आहे. कालावधी संपल्यानंतर बेरोजगारीमुळे तरुणांवर आत्महत्येची वेळ आली आहे. कायमस्वरूपी नोकरी आणि वेळेवर वेतनासाठी राज्यभर लढा उभारू, असे संभाजी माळवदे यांनी सांगितले.





