Nagar | पीक विम्य़ाची थकीत रक्कम द्या

नगर, (प्रतिनिधी) – नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकासणी पासून सुरक्षा कवच देणाऱ्या पिक विम्याची मंजूर रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे, स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर सोमवार (दि.९) रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाला राज्यभरातून शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांचे सन २०२३-२४ च्या खरीप व रब्बी हंगामातील थकीत पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
जिल्हा पातळीवर अनेक आंदोलने झाली मात्र खोट्या आश्वासन पलीकडे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. राज्यात २१ लाख ४५ हजार ६६५ शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची थकीत रक्कम विमा कंपनी कडून येणे आहे.
ही थकीत रक्कम २ हजार ३०६ कोटी रुपये असून ती सरकार कडून कंपनीला देण्यात आली. तरच ती शेतकऱ्यांना वितरित केली जाऊ शकते.
गेली दीड वर्ष शेतकरी आशेने वाट पहात आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नाही. सरकारी अधिकारी व कंपन्यांनी दिलेली आश्वासने व तारखा खोट्या ठरल्यामुळे पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
या मोर्चात सहभागी होण्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, स्व.भा पक्ष प्रदेशाध्यक्ष, मधुसूदन हरणे, स्व.भा. पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, अर्जुन तात्या बोराडे, रुपेश शंके, लक्ष्मण रांजणे, निलेश शेडगे आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.





