आठ दिवसांत दंड भरा, नाहीतर अटक; वाहतूक नियमभंगापोटी रक्कम थकवलेल्या 732 जणांविरुद्ध वॉरंट

पुणे – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर खटला दाखल झाल्यानंतर समन्स बजावले जाते. पण, त्यावेळी हजर न राहणाऱ्या वाहनचालकांवर मोटर वाहन न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. पहिल्या टप्प्यात 732 वाहन चालकांना हे वॉरंट जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरीत वाहनचालकांना वॉरंट बजावले जाणार आहे. ही माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) विजय मगर यांनी दिली.
वाहतूक विभागाने सन 2020 पासून वाहतूक नियमांचे भंग केल्यानंतर तडजोड खटल्यासाठी न्यायालयासमोर वेळोवेळी उपस्थित राहिले नाहीत, अशा वाहनधारकांवर खटले दाखल करण्यात आले होते. त्यानुसार न्यायालयाने संबंधितांना वेळोवेळी समन्स बजावले. तरीही अद्यापपर्यंत संबंधित वाहनधारकांनी पोलीस अथवा न्यायालयाध्ये तडजोड केलेली नाही. या प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत.
याकरिता न्यायालयाने अशा वाहनधारकांवर अटक वॉरंट जारी केलेले आहेत. या वॉरंटमधील संबंधित वाहनधारकांनी आठ दिवसांत मोटार वाहन न्यायालयात येऊन खटल्यासंबंधी निकाल लावून घेणे गरजेचे आहे. अन्यथा पोलीस विभागास संबंधितास अटक करुन न्यायालयासमोर हजर करावे लागणार आहे. तरी वाहनचालकांनी आपले वाहनावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत प्रलंबित असलेली तडजोड न्यायालयात त्वरीत प्रभावाने करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांना अटक टाळता येईल, असे आवाहनही मगर यांनी केले आहे.





