पिंपरी | वीजयंत्रणांसाठी जागेच्या उपलब्धतेसाठी लक्ष द्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवडसारख्या महानगरांमध्ये वीजयंत्रणांसाठी जागेच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र यानी केली आहे.
लोकेश चंद्र यांनी पुणे परिमंडलातील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि अधीक्षक अभियंते अरविंद बुलबुले, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ते म्हणाले, पुणे परिमंडलमध्ये सहा अतिउच्चदाबाचे उपकेंद्र उभारण्याचे प्रस्ताव मंजूर करून महापारेषणकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच महत्वाच्या चाकण व भोसरी उपविभागांचे विभाजन करून नवीन उपविभाग व शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
वेगाने वाढत असलेली ग्राहकसंख्या व विजेची मागणी पाहता अशा प्रकारच्या प्रस्तावांसाठी व्यवस्थापन सकारात्मक आहे, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले. वीज यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी आणखी काही नव्या योजनांचा प्रस्ताव आहेत.
आवश्यक त्या उपविभागांच्या विभाजनाचे प्रस्ताव पाठवा
नवीन वीजजोडण्यांसह विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळे भविष्यवेध घेऊन विजेची वाढती मागणी पूर्ण करणार्या वितरण यंत्रणेचे जागेच्या उपलब्धतेसह नियोजन करावे.
तसेच ग्राहकसेवा व तक्रार निवारणातील तत्परता आणखी वाढविण्यासाठी विभाग किंवा उपविभाग कार्यालयांचे विभाजन आवश्यक असल्यास प्रस्ताव पाठवावेत,असे निर्देश लोकेश चंद्र यांनी दिले.





