पवारसाहेबांचा शब्द कार्यकर्ते खाली पडू देणार नाहीत

बदनामी करणारंविरोधात तक्रार करणार

दोन दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. ज्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही आणि जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामध्ये माझी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे. याबाबत सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. जे प्रामाणिक आहेत, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. कर नसेल तर डर कशाला? कितीही बदनामी करा, पवारसाहेबांसाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.

सातारा – सातारा जिल्हा व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून भविष्यातही राहणार आहे. सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील; पण पवारसाहेबांचा शब्द खाली पडून देणार नाही, अशी ग्वाही अ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

शरद पवार यांच्या उपस्थितीत रविवार, दि. 22 रोजी साताऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून त्याच्या नियोजन बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, शरद पवारांनी अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना ताकद दिली.

मात्र, पक्ष अडचणीत असताना स्वार्थासाठी त्यांनी पक्षत्याग केला. कार्यकर्ते पक्षाबरोबरच असून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच राहील. निवडणूक जवळ येईल, तसतसे राष्ट्रवादीतही इनकमिंग सुरू होईल. भाजप-शिवसेना यांच्यात बेबनाव असून त्यांचे अनेक नाराज नेते आगामी काळात राष्ट्रवादीत येतील. मी कोरेगावातूनच लढणार असून तेथील अनेकांना घरी पोहोचवायचे आहे. साताऱ्यातही उमेदवाराचा प्रश्‍न नाही.

लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या विरोधात अनेकांनी स्वत:हून लढण्याची तयारी दर्शवली आहे. सर्व सहमतीने उमेदवार दिला जाईल. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दोन वेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्याबाबत विचारले असता आ. शिंदे म्हणाले, त्याबाबत साहेबच निर्णय घेतील. दि. 22 रोजी सकाळी कर्मवीर जयंती कार्यकमास शरद पवार येणार असून दुपारी 2 वाजता त्यांचे राष्ट्रवादी भवनात आगमन होणार आहे. तेथून मिरवणुकीने पोवई नाका येथे जाऊन महापुरषांना अभिवादन केल्यावर जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक भवनात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.