पुणे जिल्हा | पवारांची की ठाकरेंची खेडमध्ये पॉवर?

शेलपिंपळगाव, {स्वाती झरेकर} – काहीही झाले तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असे माध्यमांसमोर 2019 च्या सत्ता स्थापनेवेळी ठामपणे सांगणार्या संजय राऊतांच्या आणखी एका वक्तव्याची जोरदार चर्चा सद्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात आहे.
इकडची दुनिया तिकडे होईल, पण पुढचा खेडचा आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल या वक्तव्यामुळे खेडच्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये दहा हत्तीचे बळ आले आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये एकसंध असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत पहिली ठिणगी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात पडली राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते आणि संजय राऊत या दोघांमध्ये खेड पंचायत समितीच्या सत्तासंघर्षावरून चांगलेच वाकयुद्ध झाले होते,
त्यावेळी दिलीप मोहिते यांच्या विरोधी भूमिका घेत संजय राऊत यांनी पुढच्या निवडणुकीत दिलीप मोहिते आमदार नसतील असा चंग बांधला आणि या जागेवर शिवसेनेचाच आमदार असेल असे छातीठोकपणे सांगितले आहे.
त्यामुळे आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या दोघांमध्ये ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन पक्ष संघटनेची महाराष्ट्रातील अनेक विभागांची जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांकडे सोपवली आहे, यामध्ये संजय राऊत यांच्याकडे पुणे-नाशिक विभागाची पक्षांतर्गत जबाबदारी दिली असल्याची बोलले जात आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्ये शिवसेनेला कोणकोणत्या जागा मागायच्या याचे सर्व अधिकार संजय राऊत यांच्याकडे असणार आहेत, त्याचबरोबर सोबतीला माजी मंत्री सचिन आहिर संपर्क प्रमुख असणार आहेत.
दोन्ही गटातील इच्छुक
पवार गट : रामदास ठाकूर, सुधीर मुंगसे, अतुल देशमुख
ठाकरे गट : बाबाजी काळे, अमोल पवार
दोघांचा फॉर्म्युला ठरला नाही तरी…
महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागांचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसला तरी, इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.
त्यामुळे आगामी काळात ही जागा शरद पवारांकडे जाते की, संजय राऊतांनी दिलेले आवाहन पूर्ण करण्यासाठी शिवसेना या जागेवर दावा कायम ठेवते हे येणारा काळच ठरवेल.
त्यावेळी गोरेंचा अप्रत्यक्ष पराभव
दिलीप मोहिते पाटील यांचे सर्वच विरोधक 2014मध्ये एकत्र आले आणि सुरेश गोरे यांचा विजय खेचून आणला तर 2019 मध्ये देखील सुरेश गोरे यांचा विजय निश्चित मानला जात होता; परंतु शिवसेनेच्या विरोधात भाजपने अतुल देशमुख यांच्या रुपाने अपक्ष उमेदवार देत तिरंगी लढतीत शिवसेनेच्या सुरेश गोरे यांचा अप्रत्यक्ष पराभव घडवून आणला.
त्यावेळी अतुल देशमुख यांच्याबरोबर आताचे भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि आता शिवसेनेकडून इच्छुक असलेले अमोल पवार या दोघांचा देशमुख यांच्या प्रचारात हिरहीरीने सहभाग होता.
अप्रत्यक्ष सुरेश गोरे यांचा पराभव करून शिवसैनिकांचा रोष त्यावेळी अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, अमोल पवार यांनी घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे तिघेही इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.





