-ना. रामदास आठवलेंनी केली सूचक कविता
-राहुल गांधींना विरोधी पक्षनेते पद देणार
सातारा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कराडच्या सभेत खा. उदयनराजेंची कॉलर उडवली होती. त्या घटनेचा धागा पकडत ना. रामदास आठवले यांनी सूचक कविता केली. ते म्हणाले, पवारांनी ज्यांची कॉलर उडवली, ती सीट आता आम्ही पाडली…! असे सांगत त्यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळावर संधी देण्यात येणार असून लवकरच ते प्रचारात सक्रिय दिसतील, असेही आठवले यांनी सांगितले.
साताऱ्यात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव, विक्रम पावस्कर, आप्पा तुपे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आठवले म्हणाले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना रिपाइंचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पाटील यांच्या पाठीशी सर्व दलित समाज खंबीरपणे पाठीशी उभा आहे. देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे. मात्र, मागील निवडणुकीत कॉंग्रेसला 43 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विरोधीपक्षनेतेपदाचा दर्जा मिळाला नाही. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींसोबत मी अजून वीस वर्ष असणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अजून वीस वर्ष पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या थोड्या फार जागा वाढतील. त्यामुळे राहुल गांधी यांना कॅबिनेट दर्जाचे विरोधीपक्षनेते पद आम्ही देणार आहोत, असे आठवले यांनी सांगितले.
साताऱ्यात रिपांइचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड नाराज असल्याबाबत आठवले म्हणाले, मला उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत. त्याचबरोबर सत्तेत समान संधी न मिळाल्यामुळे देखील त्यांची नाराजी आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महामंडळावर अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात येईल. गायकवाड गेली अनेक वर्ष माझ्यासोबत इमानदारीने काम करत राहिले आहेत. मला विश्वास आहे की लवकरच त्यांची नाराजी दूर होईल व ते प्रचारात सक्रियपणे सहभागी झालेले दिसून येतील.
छप्पन गटांना मी एकटा भारी
खा. उदयनराजेंच्या उमेदवारी अर्जाच्या रॅलीत रिपाइंचे झेंडे दिसून आले, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर उपस्थित आप्पा तुपे यांनी ते रिपाइं कवाडे गटाचे झेंडे असल्याचे स्पष्ट केले. त्यावर आठवले म्हणाले, रिपाइं मध्ये छप्पन गट आहेत. मात्र, मी एकटा सर्वांना भारी आहे. साताऱ्यात वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे नरेंद्र पाटील यांचा विश्वास निश्चित आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याप्रमाणे मी असे प्रयोग करून पाहिले आहेत. मात्र, मुख्य प्रवाहातील पक्षाच्या मदतीशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही, असा अनुभव हाती आला. म्हणूनच पुन्हा एकदा भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.