मंत्रालयात आज विशेष बैठक
पुणे – पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी (दि.13) घेणार आहेत. पुरंदर विमानतळासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळालेल्या आहेत. मात्र, जागेचे भूसंपादन आणि मोबदला देण्यासंदर्भात अजूनही ठोस असा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या बैठकीत भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना द्यायचा मोबदला यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई येथे मंत्रालयात ही विशेष बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुरंदर विमानतळासाठीच्या जागेपासून ते सर्व प्रकारच्या मान्यता यापूर्वीच केंद्र आणि राज्य सरकराकडून देण्यात आलेल्या आहेत.
केवळ भूसंपादन हा एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे, त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. यापूर्वी झालेल्या बैठकीत पवार यांनी पुरंदर विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन करण्याबरोबरच भूसंपादनासाठी चांगले अधिकारी नेमण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार चार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.