मुंबई – यंदा दसरा सणाचा दिवस राजकीय नेत्यांच्या मेळाव्यांनी व्यस्त असणार आहे. राज्यातील राजकारणात अनेक वर्षांपासून विचारांचे सोने लुटण्याची परंपरा असून, ती यावर्षीही खंड न पडता सुरू राहणार आहे. यामुळे नागपूरपासून ते भगवानगड आणि मुंबईपर्यंत तर आता पुण्यातही दसरा मेळाव्याचे (Dasara Melava 2023) आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा काही महिन्यांवर आल्याने आतापासून राजकीय वातावरण तापणार आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकांपासून राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.गतवर्षी जुनमध्ये शिवसेनेत (Shivsena split) पडलेल्या फूटीनंतर राष्ट्रवादीत (ncp) झालेल्या “दादा’गिरीमुळे राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. ही फुट केवळ पक्षापुरते मर्यादित न राहता कुटुंबा-कुटुंबामध्येही पडल्याचे दिसून येत आहे. अशातच आता सत्ताधारी विरोधक आमने-सामने असून, या ना त्या मुद्द्यावर एकमेकांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न करतात. याच दरम्यान आता मंगळवारी होऊ घातलेल्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे आणि आता पुण्यातून शरद पवारही (Sharad Pawar) दसरा मेळाव्यातून तोफ डागणार आहेत. त्यामुळे मंगळवारचा दिवस राजकीय आखाड्यांचा वार म्हणूनही ओळख निर्माण करेल यात शंक नाही.
पंकजा मुंडे कुणावर डागणार तोफ?
दसऱ्याच्या दिवशी सकाळी आठ वाजता राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे (RSS) सरसंघचालक हे संबोधित करणार आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. पक्षाकडून सातत्याने डावलण्यात येत असल्याने या मेळाव्यातून त्या त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवून कुणावर हल्ला करणार हे पाहावे लागणार आहे.
यंदा शरद पवारांची देखील सभा
यंदा दसऱ्याच्या सभेत आणखी भर पडणार आहे. यावर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात सभा पार पडणार आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी 10 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी घोषित केलेल्या युवा संघर्ष यात्रेची सुरूवात पुण्यातून होत आहे. या यात्रेला शरद पवार हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानिमित्ताने ही जाहीर सभा होणार आहे. या सभेतून ते भाजपसह पक्षातून फुटून गेलेल्यांवर कोणत्या शब्दात शरसंधान साधतात हे पहावे लागणार आहे.
शिंदेच्या भाषणानंतर ठाकरेंची तोफ धडाडणार
मागील वर्षी शिवसेनेत बंड करून पक्ष आणि चिन्हांवर ताबा मिळवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना यंदाही शिवाजी पार्कचे मैदान दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) मिळवता आले नाही. त्यानंतर आपण पुन्हा या मैदानासाठी कधीच अर्ज करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तेव्हा त्यांचा यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असून, सायंकाळी पाच वाजता ते शिवसैनिकांना संबोधित करून ठाकरेंवर कसा निशाणा साधतात हे पाहावे लागणार आहे. त्यानंतर रात्री सात वाजता शिवतीर्थावर शिवसेना (ठाकरे) गटाची म्हणजे उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. यामध्ये ते एकनाथ शिंदेसह भाजप, राष्ट्रवादीचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.