अभिनेते पवन कल्याण बनणार आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री?

अमरावती –आघाडीचे तेलगू अभिनेते पवन कल्याण नव्या भूमिकेत दिसण्याची चिन्हे आहेत. जनसेना पक्षाचे प्रमुख असणाऱ्या कल्याण यांना आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे.
आंध्रात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांत तेलगू देसम पक्ष (टीडीपी), जनसेना आणि भाजपचा समावेश असणाऱ्या एनडीएने बाजी मारली. आता टीडीपीचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू पुन्हा आंध्रचे मुख्यमंत्री बनण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचा उद्या (बुधवार) शपथविधी होणार आहे.
त्यावेळी ५६ वर्षीय कल्याण हेही मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांना केवळ मंत्री न बनवता उपमुख्यमंत्रिपदाचा मान दिला जाणार असल्याचे समजते. टीडीपी आणि भाजपला एकत्र आणण्यात कल्याण यांनी महत्वाची भूमिका बजावली. एवढेच नव्हे तर, एनडीएच्या विजयात त्यांच्या झंझावाती प्रचाराचे योगदान मोठे आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी हे कल्याण यांचे मोठे बंधू आहेत. चिरंजीवी यांनी २००८ मध्ये प्रजा राज्यम पक्षाची स्थापना केली. त्यावेळी चिरंजीवी यांच्या समवेत कल्याण यांनीही राजकीय प्रवास सुरू केला. मात्र, चिरंजीवी यांनी त्यांचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर कल्याण राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय राहिले नाहीत.
नंतर कल्याण यांनी २०१४ मध्ये स्वपक्षाची म्हणजे जनसेनेची स्थापना केली. त्यानंतरच्या निवडणुकांत कल्याण फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. मात्र, यावेळी त्यांनी स्वत:चे नाणे खणखणीतपणे वाजवून दाखवले.





