मुंबई २६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकन कोर्टाने दिली मंजुरी

मुंबई – 2008 साली मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी तहव्वूर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास कॅलिफोर्नियातील अमेरिकन न्यायालयाने परवानगी दिली आहे. भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची 10 जून 2020 रोजी मागणी करत तक्रार दाखल केली होती. जो बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी, मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली. जुन 2020 भारताच्या विनंत्तीवर राणाला अमेरिकेत तात्पुरती अटक झाली होती. 26/11 च्या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता त्यातील सहा अमेरिकन होते. हे हल्ले 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते. मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले 60 तासांहून अधिक काळ सुरू होते. या भीषण हल्ल्यानंतर देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पाकिस्तानचा असलेला राणा कॅनडियन बिझनेसमॅन आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, अमेरिकन सरकारच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की, राणाला माहित होतं त्याचा बालपणीचा मित्र, पाकिस्तानी-अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होता. त्यामुळे त्याने हेडली, दहशतवादी संघटना आणि त्याचे सहकारी यांच्या कारवायांमध्ये मदत केली होती.
भारत आणि अमेरिका यांच्यात प्रत्यार्पण करार आहे. राणाचे भारताकडे प्रत्यार्पण हे पूर्णपणे कराराच्या अधिकार क्षेत्रात असल्याचा निकाल न्यायाधीशांनी दिला आहे. मुंबई २६/११ हल्ल्यानंतर भारताला हे मोठे यश मिळाले आहे.

