प्रभात वृत्तसेवा पवनानगर – बऊर येथे ९ ऑगस्ट २०११ रोजी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या आंदोलन छेडण्यात आले होते. त्या वेळी झालेल्या पोलिस गोळीबारात शेतकरी कांताबाई ठाकर, शामराव तुपे आणि मोरेश्वर साठे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी (दि. ९) येळसे येथील शहीद स्मारकावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.सकाळी बऊर येथून प्राणज्योत आणून दुपारी १२.४० वाजता स्मृतिस्थळावर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथराव टिळे, गुलाब काका म्हाळसकर, आर.पी.आय. अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, बाळासाहेब घोटकुले, भाजपा मंडल अध्यक्ष दत्तात्रय माळी, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश ठाकर, पवन फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, माजी सरपंच अशोक राजिवडे, काँग्रेस नेते दिलीप ढमाले, गुलाब वरघडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. बंदिस्त जलवाहिनी विरोधात झालेल्या आंदोलनात शहीद झालेले शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना भारत ठाकूर म्हणाले की, २०११ च्या आंदोलननंतर हा प्रकल्प स्थगित करण्यात आला होता. मात्र या महायुती सरकारने या प्रकल्पावरील स्थिगिती उठविण्याचे काम यांनी केले आहे. गेल्या १४ वर्षांपासून हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी शेतकरी मागणी करत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प कायमचा रद्द करून सगळ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी करण्यात आली. मावळ तालुक्यतील बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरुपी बंद व्हावा, अशी आमची मागणी होती. ज्यावेळी राज्यात आघाडीचे सरकार होते, तेव्हा या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती, ती स्थगिती आताच्या महायुती सरकारने आता ती उठवली आहे. जनतेसह आमचाही या जलवाहिनीला पूर्णतः विरोध आहे आणि भविष्यातही राहील, अशी माहिती काँग्रेसचे यशवंत मोहोळ यांनी दिली. “बंदिस्त जलवाहिनीसंदर्भात शेतकऱ्यांची जी भूमिका होती, ती आजही ठाम आहे. मावळ तालुक्यातील जनतेने जो निर्धार केला होता, त्या माध्यमातून कुठलेही सरकार याबाबत पुढचा कोणताही निर्णय घेत नाही. हेच या आंदोलनाचे खऱ्या अर्थाने यश आहे.” – बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री