पिंपरी | पवना धरणात ३३ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

पवन मावळ, {रवी ठाकर} – मावळ तालुक्यातील शेती ही धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवना धरणात ३३ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. तर तालुक्यातील पुसाणे, आढले आणि मळवंडी धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आला आहे. जर यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातील शेतकर्यांसह पिंपरी चिंचवडकरांवर पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
मावळ तालुक्यात पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो. हा पाऊस खरीप हंगामातील भात शेतीसाठी पुरक असा आहे. मात्र त्यानंतर रब्बीच्या पिकासाठी शेतकर्यांना धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. तसेच अनेक शेतकर्यांनी ऊस लावला असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. दरवर्षी परतीचा पाऊस चांगला होत असल्याने ऑक्टोबर महिन्यात धरणे १०० टक्के भरलेली असतात.
त्यामुळे सर्व धरणातील पाणीसाठा शेतकर्यांना वर्षभर पुरतो. मात्र गेल्यावर्षी अपेक्षित परतीचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणातील पाण्याचा ऑगस्ट महिन्यात वापर होऊ लागला. तसेच यंदा उन्हाळा जास्त असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागले आहे.
मावळ तालुका हा पाणीदार तालुका म्हणून ओळखला जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये येथील भूजल पातळी तब्बल एक फूटाने खोल गेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बोअरवेल आणि विहिरींचे पाणी आटले आहे. शेतकर्यांना शेतीसाठी धरण आणि नदीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
मात्र पुसाणे, आढले, मळवंडी या धरणांना लाभक्षेत्र अधिक असल्याने शेतीसाठीही या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या धरणातील पाण्याची पातळी जरी कमी झाली असली तरी कासारसाई धरणात सध्या पवनेपक्षा अधिक म्हणजे ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र पवना धरणाच्या तुलनेत कासारसाई धरणाची साठवण क्षमता अत्यंत कमी आहे.
जर जून महिन्यात पावसाने ओढ दिली तर मात्र पिंपरी चिंचवड शहरात पाणी कपात करावी लागणार आहे. तसेच शेतीसाठीही पाण्याच्या वापरावर मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांसह मावळमधील शेतकर्यांची चिंता वाढू शकते.
पवना धरणात सध्या २५.१५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा ३३ दिवस म्हणजे ३० जून पर्यंत पुरेल, असे नियोजन आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. – रजनीश बारिया, शाखाधिकारी, पवना धरण




