स्टॉकहोम – अमेरिकेतील पॉल आर. मिल्ग्रोम आणि रॉबर्ट बी. विल्सन यांना यावर्षीचे अर्थशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. लिलाव प्रक्रियेतील सुधारणा आणि लिलाव प्रक्रियेसाठी नवीन स्वरूपासाठी केलेल्या संशोधनासाठी या दोघांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. आज रॉयल स्वीडिश ऍकेडमी ऑफ सायन्सेसचे सरचिटणीस गोरान हान्सोन यांनी या संदर्भातील घोषणा केली.
दुसऱ्या महायुद्धानंतर जेवढी जागतिक मंदी निर्माण झाली होती, त्यापेक्षाही अधिक भीषण मंदीचे वातावरण सध्या करोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीमुळे जगभर निर्माण झाले आहे. अशा मंदीच्या काळात वस्तू आणि सेवांची विक्री करणे पारंपरिक पद्धतीने विशेष अवघड बनलेले असते.
अशा काळात लिलाव प्रक्रियेतील नावीन्यपूर्ण स्वरूपाच्या अंगिकाराने वस्तू आणि सेवांची विक्री करणे सोपे होणे शक्य आहे. या संशोधकांनी केलेल्या संशोधनाद्वारे जगभरातील विक्रेते, ग्राहक आणि करदात्यांना फायदा होणेही शक्य आहे.
नोबेल पारितोषिकामध्ये या संशोधकांना 10 दशलक्ष क्रोना (1.1 दशलक्ष डॉलर) इतकी रोख रक्कम आणि सुवर्णपदक दिले जाणार आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 1969 पासून 2019 पर्यंत आतापर्यंत 84 जणांना देण्यात आले आहे. यामध्ये केवळ दोन महिला अर्थतज्ञांचा समावेश आहे.
जगभरातील अन्न सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमाला शुक्रवारी यंदाचा शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.