प्रभात वृत्तसेवा पौड – महिलांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलवणारा होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा कार्यक्रम चाले येथे रविवारी संपन्न होत आहे. सोबतच अंबडवेट-कोळवण गणातील आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार आहे. तर नांदगाव येथील गौरी सजावट स्पर्धेचे देखील बक्षिस वितरण होणार आहे. नांदगाव येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चेतन फाले व विद्यमान सरपंच मंजुळा सोपान फाले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर व माजी उपसभापती सारिका मांडेकर तसेच चांडाळ चौकडी फेम अभिनेते रामभाऊ जगताप हेदेखील उपस्थित राहणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अंबडवेट-कोळवण गणात आदर्श गणेश मंडळ स्पर्धा व नांदगावात घरगुती गौरी सजावट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी (दि. 12) रोजी चाले येथील सुभद्रा लॉन्स येथे होणार आहे. याच कार्यक्रमात महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यातील प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक साडी भेट देण्यात येणार असून लकी ड्रॉ मधील विजेत्यास अॅक्टीव्हा गाडी देण्यात येणार आहे. तसेच पाच भाग्यवान विजेत्यांना आकर्षक मानाची पैठणी देण्यात येणार आहे.यावेळी देण्यात येणार्या बक्षीसांत वॉशिंग मशीन, फ्रीज, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोन, वॉटर फिल्टर, कुलर व गॅस शेगडी यांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात सामाजिक जबाबदारी म्हणून तालुक्याच्या वारकरी संप्रदाय समाज दिंड क्र 96 साठी जागा घेण्यासाठी आर्थिक मदत, पंढरपुर महिना वारी करणार्या वारकर्यांचा एक वर्षाचा खर्च, पत्रकार संघाच्या पत्रकार भवन इमारतीसाठी आर्थिक मदत, श्री संत सेना महाराज नाभिक संघटना मुळशी यांना जागा घेण्यासाठी आर्थिक मदतीते वाटप यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अंबडवेट- कोळवण पंचायत समिती गणातील महिला-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चेतन फाले तथा विद्यमान सरपंच मंजुळा सोपान फाले यांनी केले आहे.