बीजिंग – चीनने चंद्रावरील नमुने आणण्यासाठी अंतराळात सोडलेले “चॅंग-5′ हे अवकाश यान मध्यरात्रीच्या सुमारास पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले आणि आपल्याबरोबर चंद्रावरील नमुनेही या यानाने आणले आहेत. चंद्रावरील नमुने 40 वर्षांनंतर पृथ्वीवर आणले गेले आहेत.
हे अंतराळयान रात्री 1:59 वाजता उत्तर चीनच्या अंतर्गत मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील सिझिवांग बानरवर उतरले. त्यामुळे चीनची “चॅंग-5′ मोहिम पूर्णपणे यशस्वी झाली आहे, असे “चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’चे प्रमुख झॅंग केजान यांनी सांगितले.
अंतराळात प्रवेश करणे, चंद्रावर उतरणे आणि नमुने घेऊन परत पृथ्वीवर परतणे या तीन महत्वाच्या टप्प्यांचा समावेश असलेली ही मोहिम 2004 साली सुरू झाली होती, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. “चॅंग-5′ मिशनच्या पूर्ण यशाबद्दल चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.
“चॅंग-5’ही चीनची पहिलीच चांद्रमोहिम असून या मोहिमेंतर्गत चंद्रावरील दगडांचे आणि मातीचे नमुने आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. या मोहितेच्या यानाचे प्रक्षेपण 24 नोव्हेंबर रोजी झाले होते.
40 वर्षांपूर्वी अमेरिकेने अंतराळवीरांसह चंद्रावर अवकाश यान पाठवले होते. तर रशियाकडून पाठवण्यात आलेल्या मानवविरहीत अवकाशयानाने चंद्रावरून उड्डाण केले होते आणि ते थेट पृथ्वीवर आले होते.
पृथ्वीवरून पाठवलेले मानवरहित यान चंद्रावर उतरवून परत पृथ्वीवर उतरवण्याचा हा चीनचा पहिलाच प्रयत्न होता. या सर्व मोहिमेची रंगीत तालिम 2014 सालीच घेतली गेली होती. इतक्या दीर्घकाळापासून तयारी सुरू असल्यानेच या मोहिमेच्या यशस्वितेबद्दल चीनला आत्मविश्वास होता, असे खगोलशास्त्रज्ञ, सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक्स, हार्वर्ड ऍन्ड स्मिथसोनियनमधील डॉ. जोनाथन मॅकडॉवेल म्हणाले.