Patra Chawl Land Scam Case: संजय राऊतांना अडचणीत आणणारं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे?

मुंबई – काल संजय राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले आणि राज्यभरातील राजकारण तापले. 9 तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि कार्यालयात घेऊन गेले. त्यानंतर आज राऊत यांना चार ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे ज्यामुळे शिवसेनेचे बडे नेते संजय राऊत अडचणीत आले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया…
पत्राचाळ जमीन घोटाळा 1 हजार 34 कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम दिले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3000 फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूंना, उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011,12,13 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना देण्यात आले.
या प्रकरणात ईडीने 2 फेब्रुवारीला अटक केलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. प्रवीण राऊत हे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाशी करार केला होता. ही चाळ तब्बल 47 एकरांवर वसली आहे. तेथे 627 भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावीत, असा करार2010 मध्ये करण्यात आला. त्यानंतर प्रवीण राऊत यांनी हौसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे (एचडीआयएल, डीएचएफएफ समूहातील कंपनी) राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल 1074 कोटी रुपये जमवले. त्याचवेळी पत्राचाळीचा काहीही पुनर्विकास केला नाही. त्याशिवाय याआधारे त्यांनी बँकेतूनही 95 कोटी रुपयांचे कर्ज मिळवले असल्याचेही समोर आले आहे.
हा सर्व पैसा प्रवीण राऊत यांनी त्यांचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात वळते केले. यातील 83 लाख रुपये प्रवीण यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा ईडीचा संशय आहे. याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली होती. त्यावेळी वर्षा यांनी 55 लाख रुपये माधुरी यांना परत केले. परंतु त्यानंतर ईडीने एप्रिल महिन्यात पालघरमधील जमीन, दादर येथील फ्लॅट व किहीम येथील आठ भूखंडांवर टाच आणली. यांतील भूखंड व जमीन प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे. तर दादर येथील फ्लॅट वर्षा संजय राऊत यांच्या मालकीचा आहे. तर काही भूखंड हे वर्षा राऊत व स्वप्ना सुजित पारकर यांच्या नावे आहेत. दरम्यान, याच प्रकरणावरून आता संजय राऊत ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना आता 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.





