बिहारमध्ये वादळ-पाऊस आणि विजेच्या कडकडाटाने हाहाकार: ३१ जणांचा मृत्यू, शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान!

पटना – बिहारमधील नालंदा, सिवान, भोजपूर, गोपालगंज, बेगूसराय, सारण, गया, जहानाबाद आणि अरवल जिल्ह्यांत वादळी वारा, जोरदार पाऊस आणि विजेच्या कडकडाटाने थैमान घातले आहे. झाडे, भिंती, पूल आणि कच्ची घरे कोसळल्याने प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली. या जिल्ह्यांत एकूण ३१ जणांचा मृत्यू झाला, यात सर्वाधिक नालंदा जिल्ह्यात १३ जणांचा बळी गेला.
नालंदा जिल्ह्यातील मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगवां गावात देवीस्थानची भिंत आणि त्यावर पडलेले पिंपळाचे विशाल झाड कोसळले. या मलब्यात दबून एकाच ठिकाणी सहा जणांचा मृत्यू झाला. इस्लामपूर येथील बालमत बिगहा गावाजवळ पूल कोसळल्याने आजी, तिचा दोन वर्षांचा नातू आणि नऊ महिन्यांची नात यांचा मृत्यू झाला. पावापुरी येथील दुर्गापुर खंधा येथे ताडाच्या झाडाखाली दहा वर्षीय मुलाचा, सिलावच्या माधोपुरमध्ये दोघांचा आणि राजगीरच्या सारिलचकमध्ये एकाचा मृत्यू झाडाखाली दबून झाला.
भोजपूरमध्ये माय-लेकासह पाच जणांचा बळी गेला; यात एकाचा मृत्यू विजेमुळे, तर चार जण भिंती आणि झाडाखाली दबले. बडहरा येथील महुली घाट-सिताबदियारा पीपा पूल वादळामुळे तुटला. सिवानमध्ये चार, सारणच्या पानापुरात दोन, जहानाबादमध्ये दोन आणि बेगूसरायच्या चेरिया बरियारपुरात एका तरुणीचा मृत्यू विजेमुळे झाला. गोपालगंजमध्ये झोपडीवर झाड पडून एका महिलेचा, तर गया जिल्ह्यातील मायापुर गावात भिंत कोसळून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. अरवल-पटना सीमेवर बेदौली गावात दोघांचा मृत्यू झाला.
शेतीवर संकट –
वादळ आणि पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, कच्ची घरे उद्ध्वस्त झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. गहू कापणी न झालेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला, पण कापून खेतात पडलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
मुख्यमंत्र्यांचा शोक, ४ लाखांची मदत –
मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी ३१ मृत्यूंवर शोक व्यक्त करत प्रभावित कुटुंबांनासोबत असल्याचे सांगितले. त्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला तातडीने ४ लाख रुपये अनुदान देण्याचे निर्देश दिले. तसेच, खराब हवामानात सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करत घरातच थांबण्याचे आवाहन केले.





