बीड: बीड येथील करोना कक्षात अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ उडाली. व्हेंटिलेटर बंद पडल्याने बीडमधील रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
रुग्ण तडफडत असताना काय करावे हे डॉक्टरांनाही समजत नव्हते. रुग्णाच्या नातेवाईकांनीच धावपळ करत कक्षातीलच ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न करताना या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती आहे.
संबंधित रुग्ण गेवराई तालुक्यातील असून त्या रुग्णाचा अखेर काल रात्री मृत्यू झाला.
रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना विजेची अद्ययावत सोय करून ठेवणे गरजेचे होते; परंतु असे न झाल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
दरम्यान, केवळ काही सेकंद व्हेंटिलेटर बंद पडले होते. मात्र, रुग्णाला कसलाच त्रास होऊ दिला नाही. दोन दिवसांपूर्वी सदर रुग्ण निगेटिव्ह आला होता. मात्र, काल तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याची चाचणी केली गेली तेव्हा तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळला. काल रात्री त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.