पिंपरी – “करोना’सोबत सुरु असलेल्या युद्धातील फ्रंट वॉरियर समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांवर निदर्शने करण्याची वेळ आली आहे. रुग्णसेवेत कोणताही खंड पडू न देता या “करोनायोद्ध्यां’नी पुन्हा एकदा आपल्या मागण्या मांडल्या. पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये महापालिका आस्थापनेवरील सर्व पदव्युत्तर पदविका आणि पदवीधारक डॉक्टरांनी वेतनवाढीचा लाभ न मिळाल्याने सोमवारी (दि. 15) काळ्या फिती लावून काम केले.
वायसीएम रुग्णालयासह भोसरी रुग्णालय, चिंचवड येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय) आदींमध्ये तसेच महापालिका आस्थापनेवरील पदव्युत्तर पदविका आणि पदवीधारक डॉक्टर असलेल्या मनपाच्या अन्य रुग्णालये व दवाखान्यांमध्ये देखील संबंधित डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले. राज्य शासनाकडील सर्व पदविका आणि पदव्युत्तर पदवी अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी आणि विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना अनुक्रमे 3 व 6 प्रोत्साहनपर वेतनवाढ मंजूर करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडील समकक्ष पदव्युत्तर पदविका आणि पदवीधारक डॉक्टर्स संबंधित आदेशाचा लाभ मंजूर दिनांकापासून घेत आहेत. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाकडून संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. स्थायी समिती सभेत 27 डिसेंबर 2016 रोजी याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.
मनपा आस्थापनेवरील डॉक्टरांना पदव्युत्तर पदवी आणि पदविका असूनही वेतनवाढीचा लाभ दिला जात नाही. “करोना’च्या काळात वेतनवाढीची मागणी करून वेठीस धरण्याचा मानस नाही. मात्र, न्याय मिळायला हवा, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली आहे.