Nagar | जळीतकांडातील व्यापाऱ्यांना राजकीय नेत्यांकडून धीर

नेवासा, (प्रतिनिधी) – नेवासा शहरात झालेल्या अग्नितांडवात बारा दुकानांना लागलेल्या आगीत सर्वच्या सर्व दुकाणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दुर्घटनास्थळी भेट दिली.
आजी – माजी आमदारांच्या सुपूत्रांनीही नुकसानग्रस्त ठिकाणची पाहणी करून जळीत प्रकरणातील व्यापाऱ्यांचे सांत्वन करत धीर दिला. शहरातील आजी – माजी आमदारांच्या पदाधिकाऱ्यांनी जळीत कांडातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना स्वत: मदत करून समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करत अर्थिक मदत दिली.
शहरात शुक्रवारी लागलेल्या आगीत बारा दुकाने जळून खाक होत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आमदार शंकरराव गडाख यांचे सुपूत्र युवानेते उदयन गडाख आणि भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे सुपूत्र विष्णू मुरकुटे यांनी शहरात घडलेल्या दुर्देवी जळीत कांडाची पाहणी करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे सांत्वन करत धीर दिला.
माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे माजी आमदार मुरकुटे समर्थक माजी नगरसेवक सुनिल वाघ, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, विवेक ननवरे. श्रीकांत बर्वे, शहराध्यक्ष रोहित पवार, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रतिक शेजूळ, राजेंद्र मुथा, देविदास साळुंके व पदाधिकारी उपस्थित होते.
संजय सुखधान यांनी जळीत कांडातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना पन्नास हजार रुपयांची अर्थिक मदत जाहीर केली. समाजातील दानशूरांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यामुळे शहरातील भाजप – शिवसेना मित्रपक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदती करण्यासाठी पुढे आले.
जळीत कांडातील दुर्घटनास्थळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव, भाजपाचे युवानेते ऋषिकेश शेटे, कॉंग्रेसचे संभाजी माळवदे, आम आदमी पार्टीचे अॅड.सादिक शिलेदार यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे सांत्वन करत धीर दिला.





