प्रभात वृत्तसेवा पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी परिसरात तुरीच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पाथर्डी पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत २ लाख १० हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विक्रम मुरलीधर खेडकर (वय ४३, रा. मालेवाडी) या शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ छापा टाकला. मालेवाडी शिवारातील गट क्रमांक ११४ मधील तुरीच्या शेताची पाहणी केली असता, तुरीच्या पिकामध्ये एकूण १६ गांजाची झाडे आढळून आली. त्यांचे वजन १४ किलो १० ग्रॅम इतके असून, त्याची एकूण २ लाख १० हजार २२५ रुपये इतकी किंमत आहे. गुंगीकारक व मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या या औषधी द्रव्यांच्या लागवडीबद्दल आरोपीला ताब्यात घेण्यात आले.याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.पथकात पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, विलास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे, राजेंद्र म्हस्के, बाबासाहेब बडे, सुहास गायकवाड, ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद, कानिफनाथ गोफने, दुर्योधन म्हस्के, नागेश वाघ आणि संदीप नागरगोजे यांचा समावेश होता.पोलिसांच्या वेळेवर केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध गांजा लागवडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, परिसरात याबाबत चर्चेला उधाण आले आहे.