थकबाकीमुळे पाटणकरांवर पाणी संकट; लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने तात्पुरता दिलासा!

कोयनानगर – 37.84 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे कोयना जलसिंचन विभागाने पाटणची पाणीपुरवठा योजना बंद केल्याने शहरात पुन्हा पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं होतं. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे, प्रतिष्ठित नागरिक मिलिंद पाटील, साजिद इनामदार यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेविका शैलजा पाटील आणि अस्मा इनामदार यांनी मध्यस्थी करत तात्पुरता तोडगा काढला. परिणामी, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला आहे.
तात्कालिक उपाय, दहा लाखांची भरपाई-
पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तातडीने 10 लाख रुपये जमा करण्यात आले. याशिवाय, मार्चअखेर 4 लाख आणि पुढील तीन महिन्यांत 6 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन देण्यात आलं. या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला असून, नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कायमस्वरूपी तोडगा कधी?
पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी, दरवर्षी थकबाकीमुळे पाटणवर पाणी संकट कोसळतं. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. थकबाकीचं योग्य व्यवस्थापन, जलस्रोतांचं नियोजन आणि पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, असं नागरिकांचं म्हणणं आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दीर्घकालीन उपाय करावा, जेणेकरून भविष्यात कृत्रिम पाणीटंचाईला सामोरं जावं लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांचा संताप आणि अपेक्षा –
तात्पुरत्या तोडग्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी, ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत, असं त्यांचं मत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ तात्कालिक मलमपट्टी न करता या प्रश्नाचा कायमचा निपटारा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, भविष्यात आणखी गंभीर संकट उद्भवण्याची भीती नागरिकांना सतावत आहे.




