नवी दिल्ली – जगभरातील असंख्य शास्त्रज्ञ सध्या कोरोना उपचारांमध्ये प्रभावी ठरेल असं औषध शोधण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. मात्र अद्याप या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना ठोस यश मिळू शकलेलं नसतानाच बाबा रामदेव यांनी काल कोरोनावरील आयुर्वेदिक औषध सादर केल्याने संपूर्ण जगाच्या नजर त्यांच्यावर खिळल्या होत्या. मात्र हे औषध सादर केल्याच्या काही तासांमध्येच भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यावर ब्रेक लावला होता. अशातच आज रामदेव बाबांचे हे औषध आणखी एका वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामदेव बाबा यांच्या पतंजली या संस्थेने ‘कोरोनील’ औषधाच्या निर्मितीसाठी उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाचा परवाना घेतला होता. मात्र या परवान्यासाठी अर्ज करताना पतंजलीतर्फे हे औषध कोरोना उपचारांसाठी आहे याबाबतचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता.
पतंजलीने या औषधासाठी परवानगी घेताना या आयुर्वेदिक औषधाचा वापर केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यासाठी करण्यात येईल असं अर्जामध्ये नमूद केलं होत. पतंजलीच्या अर्जाप्रमाणेच त्यांना उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागानं केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती.
आता याबाबत उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागातर्फे पतंजलीला नोटीस धाडण्यात येणार असून कोरोनावर औषध तयार करण्याची परवानगी तुम्हाला कशी मिळाली? याबाबतचा जाब विचारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
As per Patanjali’s application, we issued them license. They didn’t mention coronavirus, we only approved license for immunity booster, cough & fever. We’ll issue them a notice asking how they got permission to make the kit (for COVID19): Licence Officer, Uttarakhand Ayurved Dept pic.twitter.com/I7CWKoJhbK
— ANI (@ANI) June 24, 2020