“बाबा रामदेवांचं औषध एवढंच प्रभावी आहे तर करोना लसीकरणावर ३५ हजार कोटींचा खर्च कशासाठी?”

इंडियन मेडिकल असोसिएशनचा सरकारला सवाल

नवी दिल्ली – योग गुरु बाबा रामदेव यांची ‘पतंजली आयुर्वेद’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोव्हीड-१९ उपचारांसाठी आपल्या कोरोनिल या औषधाला आयुष मंत्रालयाने प्रमाणित केल्याचं सांगत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणीकरण योजनेतून पतंजलीच्या करोनावरील औषधाला प्रमाणपत्र देण्यात आलंय अशी माहिती पतंजलीने दिली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पतंजलीने कोरोनिल औषधाला आयुष मंत्रालयाने प्रमाणित केल्याचं सांगितलं होत. मात्र यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलं असून इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खुद्द आरोग्यमंत्रीच अशा वैज्ञानिक आधार नसलेल्या उत्पादनाला कसं काय  प्रोत्साहन देऊ शकतात? असा प्रश्नही इंडियन मेडिकल असोसिएशनने उपस्थित केलाय.

तत्पूर्वी, बाबा रामदेव यांनी कोरोनिल लाँच केल्यानंतर खुद्द जागतिक आरोग्य संगठनेने याबाबत स्पष्टीकरण देताना, ‘आपण करोना उपचारांसाठी अथवा त्याचा संसर्ग रोखण्यासाठी कोणत्याही ‘पारंपरिक’ औषधास प्रमाणित केलेले नाही’ असं सांगितलं होत. इंडियन मेडिकल असोसिएशनने याबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना, ‘आरोग्यमंत्री जे स्वतः एक डॉक्टर आहेत, त्यांच्याच उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या करोनिल औषधाच्या प्रमाणीकरणाबाबत खोटा दावा करण्यात आल्याचा प्रकार गंभीर आहे. आरोग्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा द्यायला हवा.’ अशी मागणी केली.


आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशन) याबाबत जाहीर केलेल्या वक्तव्यामध्ये, “भारताचे आरोग्यमंत्री जर संपूर्ण देशापुढे अशाप्रकारची खोटी अनुमाने जाहीर करत असतील तर ते तार्किकदृष्ट्या योग्य आहे काय? आरोग्यमंत्री या नात्याने संपूर्ण देशासाठी अशाप्रकारची वैज्ञानिक आधार नसलेली उत्पादनं सादर करणं योग्य आहे का? अशाप्रकारच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणं नीतिमूल्यांमध्ये बसतं का?” असे प्रश्न उपस्थित केलेत.

याखेरीज, जर कोरोनिल खरोखर करोना विषाणूवर प्रभावी असेल तर सरकार करोना लसीकरणावर ३५ हजार करोड रुपयांचा खर्च कशासाठी करत आहे असा प्रश्नही आयएमएने उपस्थित केलाय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.