Patan News – पाटण तालुक्यात पावसाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या फेरबदलावरुन सुरु असलेला गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. विद्यार्थ्यांच्या नावाखाली निर्णय घेतले जात असले, तरी त्यात वारंवार बदल होत असल्याने या प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता दोन्ही प्रश्नचिन्हाखाली आली आहेत. जिल्हा परिषद (प्राथमिक शिक्षण विभाग) स्तरावर पुन्हा एकदा सुट्टीचे वेळापत्रक बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पावसाळी सुट्टी रद्द करुन उन्हाळी सुट्टी पूर्ववत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, निर्णय घ्या आणि लगेच बदला, या पद्धतीमुळे प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवरच संशय निर्माण होत आहे. पाटण हा मुसळधार पावसाचा तालुका म्हणून ओळखला जात असतानाही, काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करून पावसाळी सुट्टी लागू करण्यात आली होती. मात्र, आता त्याच निर्णयावर पलटी होत असल्याने त्या वेळी घेतलेल्या निर्णयामागील भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली निर्णय घेतले जात असतील आणि नंतर तेच बदलले जात असतील, तर यात खरे नुकसान कोणाचे, हा प्रश्न अधिक तीव्र होत चालला आहे. पावसाळ्यातील अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढे करून निर्णय राबवले गेले. आता परिस्थिती बदलताच त्याच निर्णयावर पुनर्विचार केला जात आहे. त्यामुळे ‘विद्यार्थी पुढे, सोयी मागे’ अशी भूमिका असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते बंद होणे, दरडी कोसळणे आणि दळणवळण खंडित होणे या समस्या कायम असतानाही ठोस आणि दीर्घकालीन धोरणाचा अभाव स्पष्ट दिसत आहे. वारंवार बदलांमुळे निर्माण होणाऱ्या गोंधळाचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असून याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.