ढेबेवाडी : शेतातील झाडांच्या फांद्या तोडत असताना वीजवाहक तारांचा शॉक लागून मंगळवारी दुपारी आनंदा विष्णू मोहिते (वय ५६, रा. उमरकांचन ता. पाटण) या शेतकर्याचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उमरकांचन येथील आनंदा मोहिते त्यांच्या पानंदिवली नावच्या शिवारातील शेतामध्ये झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी गेले होते. कजंरीच्या झाडावर फांद्या तोडत असताना तुटलेली फांदी 33 केव्ही विद्युत प्रवाह असणार्या तारेमध्ये अडकली. त्यावेळी जोराचा शॉक लागून आनंदा मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. दादाराम मोहिते यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, हवालदार प्रशांत चव्हाण, धीरज मुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडामधील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबतची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. पी. दोडके तपास करत आहेत.