Patan Election Result – पाटण तालुक्यातील कोयना भागातील हेळवाक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमधील निकालाने स्थानिक राजकारणाचा चेहरामोहरा बदलला आहे. या गटावर चार दशकांहून अधिक काळ प्रभाव राखणार्या पाटणकर गटाला मतदारांनी यावेळी स्पष्टपणे नाकारले आहे. पाटणकर गटाला आपला गड राखता आला नाही आणि त्यांच्या होम पिचवरच भगव्याने सत्ताबदलाचा नवा अध्याय लिहिला आहे. हेळवाक जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे अशोकराव पाटील 1,046 मताधिक्याने विजयी झाले. पंचायत समितीच्या हेळवाक गणातून मंगल माने आणि येराड गणातून विद्या शिंदे विजयी झाल्याने, हा बदल सर्वंकष असल्याचे स्पष्ट झाले. निकाल एकाच दिशेने झुकल्याने, प्रस्थापितांच्या राजकारणाचा पाया हलला आहे. पंचायत समिती गणांमध्ये व जिल्हा परिषद गटात पाटणकर गटाच्या सदस्यांची सुमार कामगिरी या पराभवाचे मुख्य कारण ठरल्याची चर्चा आहे. अनेक मंजूर कामे प्रत्यक्षात दिसली नाहीत. स्थानिक प्रश्नांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा झाला नाही आणि मतदारांशी थेट संपर्क कमी पडला. सत्ता असूनही, कामगिरीचा ठसा उमटला नाही, अशी भावना गावागावांत होती.माजी सभापती राजाभाऊ शेलार आणि माजी सदस्य बबनराव कांबळे यांच्याविषयीही नाराजीचे सूर ऐकू येत होते. दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्या पूर्ण करण्यात हे दोघे कमी पडल्याचा ठपका ठेवला जात होता. राजाभाऊ शेलार यांनी यावेळी घेतलेली माघार या भागातील बदलत्या समीकरणांचे संकेत असल्याचे मानले जात आहे. बबनराव कांबळे यांच्या कार्यकाळात ठोस कामांचा परिणाम जाणवला नाही, अशी भावनाही काही भागांत होती.उमेदवारीबाबतच्या निर्णयांमुळेही कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. स्थानिकांना डावलण्यात आल्याची भावना आणि अंतर्गत मतभेद यामुळे संघटनेत ढिलाई आली. ‘हा आपलाच गड आहे’ या आत्मविश्वासाने सावधगिरी कमी पडली. शंभूराज देसाई – सत्यजितसिंह पाटणकर मतदारांनी मात्र त्यांना गृहीत धरण्याची प्रवृत्ती नाकारली. दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील संघटन सक्रिय राहिले. बूथस्तरापर्यंत नियोजन, प्रचारातील सातत्य आणि विकासकामांचा हिशेब मांडण्याची रणनीती प्रभावी ठरली. हेळवाक गण व गटात वाढलेले मतदानही निर्णायक ठरले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक शशिकांत जाधव यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधलेला थेट संपर्क आणि गावागावांत साधलेला समन्वय, याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे मानले जात आहे. महिला आणि युवक मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले.निवडणूक जाहीर झाल्यापासून संयमाची व संघटनेला दिशादर्शक भूमिका घेणारे शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांचा या विजयात महत्त्वाचा वाटा असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. मतभेदांवर नियंत्रण ठेवत, संघटन एकसंध ठेवणे, प्रचार यंत्रणा गतिमान करणे आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे या बाबींमुळे शिवसेनेला बळ मिळाले. या संपूर्ण निकालाचा अर्थ स्पष्ट आहे की, मतदार आता केवळ नावावर किंवा परंपरेवर विश्वास ठेवत नाहीत, तर ते कामगिरी, संपर्क आणि उत्तरदायित्व या तीन गोष्टींचे हिशेब मागतात. त्यामुळे प्रस्थापितांची चार दशकांची पकड या एकाच निवडणुकीत सैल झाली. आवाज मोठा नव्हता, पण संदेश ठाम होता. कोयना भागात झालेला हा सत्ताबदल म्हणजे प्रस्थापितांना इशारा आहे. आत्मसंतोष, गटबाजी आणि कामगिरीतील शिथिलता यांची किंमत मोजावीच लागते. मतदार शांत असतो, पण तो निर्णय घेतो, तेव्हा थेट घेतो. त्यामुळे प्रस्थापितांनी आत्मचिंतन करणे अपरिहार्य आहे. कारण सत्ता परंपरेने नव्हे, तर सातत्यपूर्ण कामगिरीने टिकते.