Patan Granthotsav – वाचन संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी आणि पुस्तकांचा अमूल्य ठेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने दि. ३० व ३१ मार्च रोजी पाटण येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाडे (ता. पाटण) येथील कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालयात हा ग्रंथोत्सव होणार असून जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्य रसिकांसाठी विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. ग्रंथोत्सवाचा शुभारंभ सोमवारी (दि. ३०) सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे. या कर्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासह पाटण पंचायत समितीच्या सभापती सौ. सविता पवार व उपसभापती विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे. शंभूराज देसाई तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी सकाळी ९ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने केली जाईल. या दिंडीतून ग्रंथप्रामाण्य आणि वाचन संस्कृतीचा संदेश दिला जाणार आहे. दुपारच्या सत्रात नामवंत कवींच्या सहभागाने रंगणारे कवी संमेलन मुख्य आकर्षण असेल. मंगळवारी दि. ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता वाचन संस्कृती या विषयावर अभ्यासपूर्ण परिसंवाद आयोजित केला असून, यामध्ये तज्ज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी विनोदी साहित्य वाचनाचा खुसखुशीत कार्यक्रम सादर केला जाईल. या दोन दिवसीय महोत्सवात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे दालन खुले असणार आहे. जिथे वाचकांना विविध विषयांवरील पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध होतील. ग्रंथोत्सवाच्या सांगता समारंभात जिल्ह्यातील नियमित वाचकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रंथदिंडी, प्रदर्शन आणि संवाद सत्रांतून वाचनाची आवड निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून, जिल्ह्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.