PAT Exam : पॅट परीक्षेचा इयत्ता नववीचा पेपर फुटला; 2 युट्यूब चॅनलवर एफआयआर दाखल होणार

पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) वतीने घेण्यात येत असलेल्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेचा (पॅट) इयत्ता नववीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी दोन यू ट्यूब चॅनलवर एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.
स्टार प्रकल्पांतर्गत मराठी, इंग्रजी आणि गणित विषयांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात येते. सरकारी, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ ते २५ एप्रिल या कालावधीत परीक्षा होत आहे. पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका एससीईआरटीकडून शाळांना पुरविण्यात येतात. या परीक्षांसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्चही करण्यात येतो.
इयत्ता नववीचा मराठी प्रथम भाषा या विषयाची परीक्षा मंगळवारी (दि. ८ एप्रिल) होणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यापूर्वीच काही यू ट्यूब चॅनलवर पॅटची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी, या संदर्भातील व्हिडिओ उपलब्ध झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. मराठी विषयाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काय आहे, उत्तर कसे लिहावे, अशी सर्व माहिती व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे पेपर फुटल्याची बाब समोर आली.
चौकशी होणार
याप्रकरणी एससीईआरटीच्या वतीने दोन यू ट्यूब चॅनलवर एफआयआर दाखल करून हे चॅनल बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी दिली आहे. दरम्यान, परिक्षा रद्द करणं शक्य नसल्याचे रेखावार यांनी रात्री उशीरा स्पष्ट केले. यामुळे परीक्षा होणार असल्याचे सांगितले.





