पासवान यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पाटणा – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर शनिवारी बिहारची राजधानी पाटण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, देशातील आघाडीचे दलित नेते असणाऱ्या पासवान यांचा भारतरत्न प्रदान करून मरणोत्तर सन्मान केला जावा, अशी मागणी पुढे आली आहे.
पासवान यांचे गुरूवारी दिल्लीतील रूग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी पाटण्यात आणले गेले. त्यानंतर शहरातील गंगा नदीच्या काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याबरोबरच सर्वपक्षीय नेते पासवान यांना अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले. पासवान यांना मुखाग्नी दिल्यानंतर त्यांचे पुत्र चिराग यांची काही क्षण शुद्ध हरपली. त्यांना उपस्थितांनी सावरले.
दरम्यान, पासवान यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात यावा, अशी मागणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवले. पासवान यांचे खासदार बंधू पशुपतीकुमार पारस आणि बिहारमधील भाजपचे मंत्री प्रेम कुमार यांनीही स्वतंत्रपणे तशीच मागणी केली.





