प्रभात वृत्तसेवा पाबळ – तब्बल सहा तालुक्यांना जोडणाऱ्या बेल्हा – जेजुरी मार्गामुळे पाबळच्या विकासात भर पडत असून, पीएमपीएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) तर्फे पाबळ येथे लवकरच बस आगार (डेपो) आणि वर्कशॉप उभारले जाणार आहे. याबाबतची कागदोपत्री पूर्तता झाली असून, पीएमपीएलच्या अध्यक्षांच्या औपचारिक पाहणीनंतर महिन्याभरात उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. नुकतेच माजी सरपंच सचिन वाबळे यांसह पाबळच्या शिष्टमंडळाने पीएमपीएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष देवरे यांनी येत्या आठवड्यात पाबळला भेट देणार असल्याची माहिती दिल्याचे वाबळे यांनी सांगितले. पाबळ येथे वीज, जागा आणि पाणी या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. केवळ औपचारिक पाहणीनंतर बस आगाराच्या उभारणीस त्वरित सुरुवात केली जाईल, अशी माहिती माजी सरपंच सचिन वाबळे आणि प्रवासी समन्वयक मुकुट शिंदे यांनी दिली.यावेळी पाबळचे सरपंच सचिन वाबळे, प्रवासी समन्वयक मुकुट शिंदे, परमेश्वर चौधरी, शंकर नऱ्हे, सुरेश चव्हाण, पीएमपीएलचे अध्यक्ष पंकज देवरे, पर्यंटन समनवयक नितीन गुरव, जाधव साहेब, पंकज देवरे साहेब यांचे स्वीय सहाय्यक महेश फाळे उपस्थित होते. या गावांचा चेहरामोहरा बदलणार शिरूर, आंबेगाव, राजगुरूनगर, भोसरी, आळंदी, वाघोली, मलठण आणि धामणी यासह अनेक गावांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे. यामुळे पाबळ गावाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यास मोठा हातभार लागेल.