म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनला भीषण आग, 19 जण जखमी

Bagmati Express Accident | तमिळनाडूमधील कावराईपेट्टई स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली आणि ट्रेनला आग लागली. यात 19 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तसेच बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य वेगाने सुरू केले.
अपघात स्थळी तातडीने रुग्णवाहिका आणि एनडीआरएफ तुकड्याही पाठवण्यात आल्या. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.समोर आलेल्या माहितीनुसार, बागमती एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12578) मैसूरवरून डिब्रूगडला जात असताना कावराईपेट्टई स्थानकात प्रवेश करत होती.
त्यादरम्यान गाडीला मुख्य मार्गावरून जाण्यासाठी सिग्नल देण्यात आले होते. मात्र, काही कारणांमुळे ट्रेन मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली आणि 75 किमी प्रति तास वेगाने स्थिर असलेल्या मालगाडीला धडकली. त्यानंतर गाडीचे 12-13 डबे रुळावरून घसरले आणि ट्रेनने पेट घेतला. Bagmati Express Accident |
उदयनिधी स्टालिन यांच्याकडून जखमींची विचारपूस
दरम्यान, एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या धडकेत सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे रेल्वे बोर्डाने म्हटले आहे. मुख्यमंत्री एमके स्टालिनकडून बचाव कार्यावर लक्ष ठेवले जात आहे. या दुर्घटनेनंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी त्वरित मदत कार्य सुरू करण्यासाठी एका मंत्रीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनीही जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली सर्व 1,300 प्रवाशांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. तर सध्या बचावकार्य सुरू असून दुर्घटनेचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. Bagmati Express Accident |





