नवी दिल्ली – देशभरात रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी आणि माहिती मिळविण्यासाठी अनेक संकेतस्थळांचा वापर केला जातो. यात अनेक थर्ड पार्टी संकेतस्थळांचाही समावेश आहे, ज्यावरून प्रवाशी तिकिट बुकिंग करत असतात. यापैकी एक असलेल्या ‘रेल यात्री’ या संकेतस्थळावरून तब्बल सात लाख प्रवाशांचा डेटा लीक झाल्याचे वृत्त आहे. सेफ्टी डिटेक्टिव्ह या सायबर सिक्योरिटी फर्मने डेटा लीकबद्दल माहिती दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल यात्री या साइटवरुन चुकून सात लाख प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. रेल यात्री वेबसाइटने यूजर्सचा डेटा एका सर्व्हरमध्ये ठेवला होता. हे सर्व्हर असुरक्षित होते.
डेटा लीकबद्दल माहिती शोधणारी सिक्योरिटी फर्म म्हणाली की, युजर्सची माहिती एका सर्व्हरमध्ये ठेवली होती. ती एन्क्रिप्टेड नव्हती तसेच त्या सर्व्हरला कोणताही पासवर्ड नव्हता. इतकेच नव्हे तर आयपी ऍड्रेसने सर्वसामान्य यूजर्सही डेटा लीक करु शकतात.
दरम्यान, रेल यात्री या वेबसाइटने डेटा लीकच्या वृत्ताचे खंडन केले आहे. या प्रकारचा कोणताही डेटा लीक झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्व प्रकाराचा तपास करु, असेही रेल यात्री वेबसाइटने सांगितले.