धाराशिव : राज्यामध्ये मागील चार महिन्यांत 740 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यामध्ये जोरदार पावसामुळे लाखो एकरवरील शेतपीकांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे भाजप नेते आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटले यांनी शेतकऱ्यांना एक अजब सल्ला दिला. शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार नुकसान भरपाई देऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी हात झटकले आहेत. या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. धाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे. पाशा पटेल म्हणाले, 365 दिवसांपैकी तब्बल 322 दिवस शेतकऱ्यांना संकटाशी झगडावे लागणार आहे हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपण निसर्गाचे प्रचंड नुकसान केले आहे, त्याचे भोग आता भोगावी लागणार आहेत. संकटे एवढी मोठी आहेत कि त्या संकटामध्ये सर्वस्व झालेले नुकसान कधीही भरून येण्याची शक्यता नाही. तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देऊ शकते. पूर्ण काही देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाची सवय लावून घेणे भाग आहे. कारण पावसाची अनिश्चितता, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट हे शेतकऱ्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी. अतिवृष्टी व आपत्तीमुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी मदतीबाबत हात झटकले. दरम्यान, सध्या राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे अशा परिस्थितीत शेतकरी सरकारकडून मदतीची आस लावून बसला आहे. नेवासे तालुक्यातील बाबासाहेब सरोदे हा सामान्य शेतकरी ‘‘सरकारने साथ दिली नाही,’’ असे म्हणत हताशपणे मृत्यूला कवटाळची घटना ताजी असतानाच भाजपच्या नेत्याने असे असंवेदनशील विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाशा पटेल यांचे वक्तव्य दुर्दैवी – जानकर शेतकऱ्यासंदर्भात पाशा पटेल यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यातील शेतकरी वाईट परिस्थितीतून जात असताना पाशा पटेल यांच्यासारखे नेते असे बेजबाबदार वक्तव्य कसे करू शकतात. प्रजा ज्यावेळी अडचणीत असते त्यावेळी राजाने त्यांना मदत करणे अपेक्षित असते. सरकारी पदावर असलेल्या माणसाने असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे महादेव जानकर म्हणाले. 33 कोटी झाडे कुठे आहेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला शेतकरी तोंड देत असताना, तो अडचणीत सापडलेला असताना राज्य कृषिमूल्य आयोगाचे उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी अत्यंत चुकीचे विधान केले आहे. कर्माची फळं भोगा म्हणजे काय? शेतकऱ्यांनी या निसर्गाचं नेमकं काय नुकसान केले? हे पाशा पटेल यांनी सांगावे. या निसर्गासाठी भाजप सरकारने 33 कोटी वृक्षलागवड केली. त्या 33 कोटी झाडाचे काय झाले? ती 33 कोटी झाडे कुठे आहेत. तुम्ही चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांबाबत वक्तव्य कराल तर शेतकरी शांत बसणार नाहीत, असा इशारा छावा संघटनेकडून देण्यात आला.