प्रभात वृत्तसेवा पुणे – यंदा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीवर्ष असल्याने त्यानिमित्त १४ ऑगस्ट रोजी प्रत्येक शाळेत पसायदान म्हणावे लागणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण विभागाला आदेश दिला आहे.स्वातंत्र्य दिनी शाळांमध्ये झेंडावंदनासह विविध उपक्रम असतात. त्यात प्रभात फेरी, देशभक्तीपर व्याख्याने, समूहगीते, पारितोषिक वितरण, खाऊ वाटप असे कार्यक्रम होतात. स्वातंत्र्य दिनी सर्व माध्यमांच्या शासकीय, खासगी शाळांमध्ये झेंडावंदनानंतर विद्यार्थ्यांचे कवायत संचलन आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शाळांमध्ये किमान २० मिनिटे हा कार्यक्रम असणार आहे. कवायतीपाठोपाठ आता पसायदान गायनाचा उपक्रमही राबवावा लागणार आहे. याबाबात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्या, असा आदेश शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांना दिली आहे.