पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत: अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडी

पुणे – पर्वती विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. एका बाजूला कॉंग्रेसचे नाराज उमेदवार आबा बागुल यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत तीन वाजेपर्यंतच होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतर सचिन तावरे यांच्या प्रतिनिधीने माघारी अर्ज सादर केला. मात्र, वेळेत अर्ज न दिल्याने हा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे तावरे यांची उमेदवारी कायम राहिली आहे.
सोमवारी दिवसभरात पर्वती मतदारसंघातून 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, प्रामुख्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम, महायुतीकडून भाजपच्या माधुरी मिसाळ आणि अपक्ष म्हणून आबा बागुल या तीन उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन तावरे यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराज होत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला त्यांची नाराजी दूर करण्यात यश आले. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत त्यांचा अर्ज न मिळाल्याने तावरे यांची उमेदवारी कायम राहिली आहे. मात्र तावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांना पाठिंबा दिला आहे.
पर्वती मतदारसंघ
उमेदवारांचे नाव – पक्षाचे नाव
अश्विनी नितीन कदम – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
माधुरी सतिश मिसाळ – भारतीय जनता पार्टी
आबा बागुल – अपक्ष





