भाजपामध्ये पक्ष प्रभारी, प्रदेशाध्यक्षांची खांदेपालट

नवी दिल्ली – भाजपने आपले राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल यांची राजस्थानचे पक्ष प्रभारी आणि माजी लोकसभा खासदार हरीश द्विवेदी यांची आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली.
पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अरविंद मेनन यांना तामिळनाडूचे प्रभारी आणि माजी खासदार राजदीप रॉय यांना त्रिपुराचे प्रभारी बनवले आहे.
मेनन याआधी ही जबाबदारी सांभाळत होते, त्यांना पुन्हा ती सांभाळण्याची संधी मिळाली आहे.
भाजपच्या माजी महिला मोर्चाच्या प्रमुख विजया रहाटकर यांना राजस्थानमध्ये तर सुधाकर रेड्डी यांना तामिळनाडूमध्ये संघटनात्मक कामकाजाचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे.
याशिवाय बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या जागी भाजपने मंत्री दिलीप कुमार जैस्वाल यांना प्रदेशाध्यक्ष बनवले. राजस्थानमध्ये सीपी जोशी यांच्या जागी राज्यसभा खासदार मदन राठोड यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे.





