Pune land case : पुण्यातील मुंढवा येथील बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या मालकीच्या सुमारे ४० एकर शासकीय जमिनीचा ३०० कोटींचा घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी अटक झालेल्या शीतल तेजवानी हिने दाखल केलेल्या दुसऱ्या FIR विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती माधव जामदार यांनी स्वतःहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याबाबत कठोर सवाल उपस्थित केले आहेत. न्यायमूर्ती म्हणाले, हे तेच प्रकरण आहे ना, ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा सामील आहे? मग आतापर्यंत त्यांच्यावर FIR का दाखल झाला नाही? असा थेट सवाल न्यायमूर्ती जामदार यांनी सरकारी वकिलांना विचारला आहे. याच प्रकरणी अटक झालेल्या शीतल तेजवानी हिने सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केला होता आणि कोर्टाने नोटीसही बजावली होती. तरीही तिने घाईगडबडीत मुंबई हायकोर्टात धाव घेतली. यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत “इतकी घाई कशाला? ही याचिका मागे घ्या, अन्यथा दंड आकारू,” असे बजावले. या प्रकरणात अमेडिया एंटरप्रायझेस या कंपनीत पार्थ पवार भागीदार असून, केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हा कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचे समोर आले होते. प्रकरण गाजल्यानंतर व्यवहार रद्द करण्यात आला आणि चौकशीसाठी विशेष समिती नेमण्यात आली. मात्र या समितीच्या अहवालात पार्थ पवार यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आला नसल्याची माहिती आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. हायकोर्टाच्या या सवालानंतर आता या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.