Parth Pawar Engagement : पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा पुण्यात थाटात साखरपुडा; दिग्गजांची उपस्थिती
Parth Pawar Engagement : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटात साखरपुडा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

Parth Pawar Engagement : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार तसेच कायनात दारा यांचा साखरपुडा बुधवारी (29 जुलै) पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
संध्याकाळी सात वाजल्यापासून साखरपुड्याच्या सोहळ्याची लगबग सुरू झाली होती. पवार कुटुंबातील सदस्यांसह निकटवर्तीय आणि निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला.
सोहळ्यानंतर पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो समोर आले आहेत. एका छायाचित्रात पार्थ आणि कायनात हे सुनेत्रा पवार तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत दिसत आहेत. या छायाचित्रांच्या मागे भगवान गणेश आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींसह अजित पवार आणि पार्थ पवार यांचे छायाचित्रही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या विवाहाची घोषणा करण्यात आली होती. यापूर्वी रेवती सुळे यांच्या विवाह सोहळ्यातही पार्थ आणि कायनात एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आज दोघांचा साखरपुडा पार पडल्याने पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमुळे या साखरपुडा सोहळ्याची राज्यभर चर्चा रंगली असून, सोशल मीडियावरही पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या छायाचित्रांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
कायनात दारा आहेत तरी कोण?
कायनात दारा या पंजाबी हिंदू क्षत्रिय समाजातील असून त्यांचे गोत्र काश्यप आहे. काही माध्यमांमध्ये त्यांचा उल्लेख “काश्मिरी” असा करण्यात आला असला, तरी तो वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दिल्लीतील प्रतिष्ठित शाळेत शिक्षण
कायनात दारा यांनी नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथे असलेल्या द ब्रिटिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. ही संस्था देशातील प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जाते.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण
उच्च शिक्षणासाठी त्यांनी लंडनमधील जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) येथे प्रवेश घेतला. तेथून त्यांनी इंटरनॅशनल रिलेशन्स विषयात बी.एस्सी. (फर्स्ट क्लास ऑनर्स) पदवी संपादन केली. सामाजिक शास्त्रे, अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रांमध्ये एलएसई हे जगातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक मानले जाते.
पत्रकारितेतील अनुभव
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर कायनात दारा यांनी भारतातील अग्रगण्य इंग्रजी वृत्तवाहिन्यांपैकी एक असलेल्या NDTV 24×7 मध्ये आउटपुट एडिटर आणि रिपोर्टर म्हणून काम केले. पत्रकारितेतील या अनुभवामुळे त्यांना सार्वजनिक घडामोडी, प्रशासन आणि धोरणात्मक विषयांची जवळून ओळख झाली.
सध्या कौटुंबिक व्यवसायात सक्रिय
सध्या त्या आपल्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत असून विविध व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.








