लोहगड किल्ल्याचा भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

पवनानगर – मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा भाजे गावाच्या बाजूकडील काही भाग शनिवारी (दि. ७) सायंकाळच्या सुमारास कोसळला. सुदैवाने ह्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु किल्ल्याचा भाग कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
लोहगडाच्या पायथ्याशी पुर्वेकडील बाजूला लोहगड गाव असून किल्ल्याला लागूनच गावातील वस्ती आहे. ह्या वस्तीची लोकसंख्या ६५० पेक्षा अधिक आहे. तर उत्तर बाजूला भाजे गाव आहे. तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असून या पावसाच्या माऱ्याने गडाच्या उत्तर बाजुचा काही भाग शनिवारी साडेपाचच्या सुमारास कोसळला.
दरड कोसळल्यासारखा आवाज झाल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाला कळविले. दरड छोटी असल्याने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. परंतु स्थानिकांनी अलर्ट राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच याठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनीही अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.



