निवडणूक रिंगणात उतरण्यास पर्रिकरपुत्र उत्सुक; उमेदवारीवरून भाजपला दिला इशारा

पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत. मात्र, उमेदवारी न मिळाल्यास कठोर निर्णय घेण्याचा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
पुढील वर्षी गोवा विधानसभा निवडणूक होणार आहे. ती निवडणूक पणजी मतदारसंघातून लढवण्यास उत्पल सज्ज झाले आहेत. मात्र, स्वपक्षाने (भाजप) तिकीट न दिल्यास काय, असा प्रश्न त्यांना गुरूवारी पत्रकारांनी विचारला. प्रथम उमेदवारी मिळण्याबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला. नंतर त्यांनी उमेदवारी न मिळाल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचे सूतोवाच केले. मनोहर पर्रिकर यांनी अनेक वर्षे गोवा विधानसभेत पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
त्यांचे 2019 मध्ये निधन झाल्यानंतर त्या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीतील भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये उत्पल यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता पुढील वर्षीची निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी उत्पल यांनी चालवली आहे. भाजप त्यांना उमेदवारी देणार का याविषयी आता उत्सुकता आहे.





