38 खासदारांचे संसदीय सहायक बारामती दौऱ्यावर

कृषी विज्ञान केंद्र, इनक्यूबेशन सेंटरची पाहणी
बारामती: विकासाचे बारामती मॉडेल अभ्यासण्यासाठी दिल्लीस्थित पॉलिसी रिसर्च स्टडी या संस्थेचे 38 खासदारांचे संसदीय सहायक दोन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर आले आहेत.
खासदारांना त्यांच्या कामकाजात विविध प्रकारची मदत करण्याच्या उद्देशाने पॉलिसी रिसर्च स्टडी संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरातून काही युवकांची नियुक्ती केली जाते. परिक्षा व मुलाखतींद्वारे वेगळे कौशल्य असलेल्या 21 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांना थेट खासदारांसमवेत दिल्लीत वर्षभर काम करण्याची संधी मिळते.
संसदेचे पावसाळी अधिवेशन ते बजेट अधिवेशनापर्यंत हे युवक खासदारांच्या कामात त्यांना थेटपणे मदत करतात. संसदेत उपस्थित करावयाचे प्रश्न, त्यांची भाषणे लिहून देणे, त्यांना इतर कामकाजात मदत करणे अशा स्वरुपाची कामे या युवकांकडून केली जातात. असेच 38 खासदारांचे संसदीय सहायकांनी शुक्रवारी (दि. 7) कृषी विज्ञान केंद्र, डेअरी, इनक्यूबेशन सेंटर, बारामती नगरपालिका यांची माहिती घेत पाहणी केली.
शनिवारी (दि. 8) हे सहायक बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क, विद्या प्रतिष्ठान या संस्थांना भेट देणार आहेत. माजी केंद्रिय कृषिमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून झालेल्या विकासाच्या नोंदी या सहायकांनी घेतल्या आहेत.
बारामती हे विकासाचे मॉडेल म्हणून पुढे आले आहे. प्रत्यक्षपणे विकास कसा झाला आहे, ते पाहण्याच्या उद्देशाने आम्ही बारामतीत आलो आहोत. या दौऱ्याचा अहवाल आम्ही ज्या 38 खासदारांसमवेत काम करीत आहोत. त्यांना आम्ही सादर करणार आहोत. त्यांनाही त्यांच्या मतदारसंघात यातील काही गोष्टी यामुळे करता येतील.
– नीलेश साळुंके, संसदीय सहायक.





