Narendra Modi | Congress – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सभागृहात भाषण केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित का नव्हते, असा सवाल कॉंग्रेसने केला. तसेच, मोदींच्या भाषणातील ११ संकल्प पोकळ असल्याचे म्हटले. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदींचे भाषण नीरस वाटल्याची प्रतिक्रिया दिली. मोदी कुठल्याच नव्या बाबीवर बोलले नाहीत. त्यांनी भ्रष्टाचार बिल्कूल खपवून न घेण्याचा संकल्प बोलून दाखवला. तसे असेल तर भाजप अदानी मुद्द्यावर चर्चेला तयार का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी.वेणुगोपाल यांनी राहुल यांच्या भाषणावेळी मोदी, शहा, राजनाथ अनुपस्थित राहिल्याकडे लक्ष वेधले. त्यांना बहुधा राहुल यांची भीती वाटते किंवा त्यांचा विरोधकांच्या राजकारणावर विश्वास नसल्याची टिप्पणी त्यांनी केली. लोकसभेतील चर्चा राज्यघटनेवर होती. मात्र, मोदींनी कॉंग्रेसविषयीचे जुनेच भाषण केले. भारतीय समाजाला अन्याय, असमानतेला सामोरे जावे लागत आहे. त्यावर जनतेला मोदींकडून उत्तर अपेक्षित होते. मात्र, जुन्याच विषयांवर बोलण्याला त्यांनी पसंती दिली, असे टीकास्त्रही वेणुगोपाल यांनी सोडले.