Gas Cylinder : गॅस सिलिंडर पेचावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवनाच्या आवारात निदर्शने करण्याचे सत्र सुरूच ठेवले. विरोधकांनी घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी उत्तर देण्याची मागणी लावून धरली. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी शुक्रवारी सकाळी निषेधाचे फलक हाती घेऊन निदर्शनांचा प्रारंभ केला. त्या निदर्शनांमध्ये कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे खासदारही सहभागी झाले. गॅस सिलिंडर गेले कुठे, अशी विचारणा करणाऱ्या घोषणा त्यांनी दिल्या. सिलिंडरसारखेच मोदी संसदेतून गायब असल्याची टीका विरोधकांनी केली. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. देशात गॅसची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे जनतेत घबराट पसरली आहे. सिलिंडर बुक करण्यासाठीही रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र, बुकिंगनंतर अडीच दिवसांत सिलिंडर मिळणार असल्याचे सरकार सांगत आहे. तसे खरोखरीच घडत आहे का ते मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांनी स्वत: जाऊन पहावे, असे आव्हान त्यांनी दिले. मोठा पेच निर्माण झाला असताना मोदी आगामी निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. ते इलेक्शन मशिन बनले आहेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. पश्चिम आशियातील स्थिती आणि भारतावरील परिणाम, गॅस सिलिंडरची टंचाई आणि दरवाढ या मुद्द्यांवर संसदेत चर्चा व्हावी, अशी विरोधकांची आग्रही मागणी आहे. त्यावरून त्यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत लोकसभेत सरकारविरोधी घोषणा दिल्या. त्यामुळे गदारोळ होऊन काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची वेळ आली. संसदेत पुरी आणि परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी निवेदन दिल्याने विरोधकांच्या मागणीप्रमाणे चर्चा घेण्याच्या मुडमध्ये सरकार नसल्याचे समजते.