Parle vs Parle: सोशल मीडियावरील एका व्हायरल व्हिडिओचा शेअर बाजारात कसा अनपेक्षित परिणाम होतो, याचा प्रत्यय नुकताच आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या दौऱ्यादरम्यान तेथील पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारताची प्रसिद्ध ‘मेलोडी’ (Melody) टॉफी भेट दिली. या गोड भेटीची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आणि काही वेळातच शेअर बाजारात ‘पार्ले इंडस्ट्रीज’ (Parle Industries) या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटला जाऊन धडकले. मात्र, यामध्ये सर्वात मोठी गोची अशी की, ज्या कंपनीचे शेअर्स वाढले, तिचा ‘मेलोडी’ (Melody) टॉफी बनवणाऱ्या कंपनीशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही. ‘मेलोडी’ मीम आणि शेअर बाजारातील तेजी – पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘मेलोडी’ हा मीम ट्रेंड करू लागला. व्हिडिओमध्ये मेलोनी म्हणत आहेत, “पंतप्रधान मोदी आपल्यासोबत खूप छान टॉफी घेऊन आले आहेत.” त्यावर मोदींनी हसत उत्तर दिले, “मेलोडी.” Parle vs Parle: पंतप्रधान मोदींनी दिली ‘मेलोडी’ची भेट; पण भलत्याच ‘पार्ले’चे शेअर्स सुसाट, वाचा काय आहे नेमका प्रकार! हा व्हिडिओ व्हायरल होताच गुंतवणूकदारांनी ‘पार्ले’ नावाचा साधर्म्य शोधत शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या ‘पार्लेक्स्’ किंवा ‘पार्ले इंडस्ट्रीज’चे शेअर्स खरेदी करण्याचा सपाटा लावला. यामुळे ‘पार्ले इंडस्ट्रीज’चा शेअर थेट ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह ५.२५ रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात या शेअर्समध्ये तब्बल ६८ टक्क्यांची घसरण झाली होती. नाव सारखे, कंपन्या वेगळ्या- गुंतवणूकदारांच्या गोंधळामुळे ज्या कंपनीचे शेअर्स वाढले, त्या पार्ले इंडस्ट्रीजचा मेलोडी चॉकलेटशी काहीही संबंध नाही. मेलोडी कोणाचे उत्पादन आहे? मेलोडी हे ‘पार्ले प्रॉडक्ट्स’ (Parle Products) चे अत्यंत लोकप्रिय उत्पादन आहे. पार्ले-जी (Parle-G), मोनॅको (Monaco), क्रॅकजॅक (KrackJack) आणि हाईड अँड सीक (Hide & Seek) सारखे ब्रँड्स याच कंपनीचे आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, ‘पार्ले प्रॉडक्ट्स’ ही एक खासगी (Private) कंपनी असून ती शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) नाही. पार्ले इंडस्ट्रीज काय करते? या कंपनीची सुरुवात १९८३ मध्ये ‘एक्सप्रेस बॉटलर्स सर्व्हिसेस’ नावाने झाली होती. सुरुवातीला पार्ले-बिस्लेरी ग्रुपने याला प्रमोट केले होते, पण आता ही एक स्वतंत्र कंपनी आहे. सध्या ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट आणि पेपर वेस्ट रिसायकलिंग क्षेत्रात काम करते. कंपनीची आयपीओबाबत भूमिका स्पष्ट – या संपूर्ण प्रकारानंतर ‘पार्ले प्रॉडक्ट्स’चे उपाध्यक्ष मयंक शाह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी जागतिक व्यासपीठावर मेलोडीची भेट देणे ही भारतीय उत्पादनांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आमचे उत्पादन आधीच १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केले जाते. या व्हायरल व्हिडिओमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आमच्या विक्रीला आणखी गती मिळेल.” दरम्यान, कंपनीचा शेअर बाजारात येण्याचा (IPO आणण्याचा) सध्या कोणताही विचार नसून, कंपनी खाजगी म्हणूनच कार्यरत राहील, असेही शाह यांनी स्पष्ट केले. ‘मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?’ १९८० च्या दशकात कॅडबरीच्या ‘एक्लायर्स’सारख्या मोठ्या ब्रँड्सचे बाजारात वर्चस्व असताना पार्ले प्रॉडक्ट्सने ‘मेलोडी’ बाजारात आणली होती. चवीसोबतच कंपनीच्या ‘मेलोडी इतनी चॉकलेटी क्यूँ है? मेलोडी खाओ, खुद जान जाओ…’ या जाहिरातीने आणि जिंगलने इतिहास घडवला, ज्यामुळे हा ब्रँड आजही घराघरांत लोकप्रिय आहे. आता पंतप्रधानांच्या एका भेटीमुळे हा ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.