पुणे – सुरळीत वाहतूक होण्यासाठी वाहतूक विभागाकडून शहरांतर्गत पार्किंग व्यवस्थेमध्ये आणि एकेरी वाहतुकीत बदल केले आहेत. अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आदी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता अन्य वाहनांसाठी हे बदल अनिवार्य आहेत. दि. 18 जानेवारीपर्यंत याबाबतच्या सूचना किंवा तक्रारी असल्यास वाहतूक शाखेकडे लेखी स्वरूपात कळवाव्यात. यानंतर अंतिम आदेश काढून पार्किंगबाबत नवे बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी दिली.
नो पार्किंग, नो हॉल्टिंगसह एकेरी वाहतुकीमध्ये बदल केला आहे. या अंतर्गत हडपसर वाहतूक विभागाच्या हद्दीत सकाळी 7 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळात सोलापूर रस्त्याने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज उड्डाणपूल गाडीतळ हडपसरकडून पुणे शहराकडे ये-जा करणाऱ्या जड वाहनांना बंदी राहणार आहे. तर तुपे नाट्यगृह टी जंक्शन ते साधना विद्यालय रस्ता आणि मगरपट्टा सिटी साऊथ गेटजवळील टी जंक्शन रोड ते न्यू चूल हॉटेल टी जंक्शन रस्त्यापर्यंत एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
सिंहगड रस्त्यावर ब्रह्मा हॉटेल चौकात संतोष हॉल रोडने येणाऱ्या वाहतुकीस उजवीकडे सनसिटी रस्त्याच्या बाजूस आणि वडगाव पूल चौकाकडून येणाऱ्या वाहतुकीस डावीकडे वळण्यास बंदी करण्यात येणार आहे.
या ठिकाणी करता येणार पार्किंग
वानवडी विभागांतर्गत सोपानबाग चौक ते कॅनॉलजवळील उद्यानापर्यंतचा रस्त्यावर दुतर्फा समांतर पार्किंग
मुंढवा विभागांतर्गत बी.टी कवडे रस्त्यावर संभाजी चौक ते थोपटे चौकापर्यंतच्या रस्त्यावर पी 1, पी 2 पार्किंग
वानवडी विभागांतर्गत सोपानबाग चौक ते कॅनॉलजवळील उद्यानापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा समांतर पार्किंग
रोहिणी भाटे चौक ते अभ्युदय अपार्टमेंट उजव्या बाजूला समांतर पार्किंग
या विभागातील रस्त्यांवर “नो-पार्किंग’
दत्तवाडी – सिंहगड रोड जंक्शन चौकापासून ते चंद्रनील सोसायटीपर्यंत, पुणे महापालिकेची इ-लायब्ररी आणि अभ्यासिका इमारत ते आरे दूध केंद्र 199 पर्यंत
शिवाजीनगर – शितल हॉटेल ते वीर चापेकर चौक, ललित महल चौक ते वीर चापेकर चौक, विमलाबाई जाधव रस्त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही बाजूस
कोरेगाव पार्क – मंगलदास रस्त्याच्या दोन्ही बाजूस
खडकी – पुणे पेठ भाऊ पाटील रस्ता बोपोडी एसटीपी समोर (हॅरिसन पुलाजवळ), पुणे-मुंबई रस्त्यावरील संभाजीनगर मनपा वसाहत आणि भुयारी मार्ग ते मनपा वसाहत दरम्यानचा रस्ता
हडपसर – संजिवनी हॉस्पिटल ते सिद्धेश्वर फूड हॉटेल टी जंक्शनपर्यंत
वानवडी – एबीसी फार्म चौक ते संविधान सर्कलपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस