दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा व परिणीतीला एकत्र स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर राघव चड्ढा व परिणीती रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली.
इतकेच काय तर परिणीती आणि राघव चड्ढा यांचा लवकरच साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा साखरपुडा होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी दिल्लीत जोरदार तयारी देखील सुरू झाली आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच हा सोहळा होणार आहे. मात्र याबाबत परिणीतीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, आप खासदार संजय अरोरा आणि पंजाबी गायक हार्डी सिंधुनेही परिणीती व राघव चड्ढा यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनस व मुलगी मालती मेरीसह भारतात आली आहे. ती परिणीतीच्या साखरपुडा समारंभाला हजेरी लावण्यासाठीच आल्याचे म्हंटले जात आहे.
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. तेथेच त्यांची ओळख झाली होती. मागील सहा महिन्यांपासून ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.